मराठी भाषा संवर्धनासाठी माझी भूमिका
"लाभले आम्हास भाग्य,बोलतो मराठी." हो मराठी बोलतो किंबहुना ती बोलली ही जाते परंतु वर्षभरातून फक्त एक दिवसच म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी, हो त्याला कारणही तसेच आहे. अगदी जगभरातील मराठी भाषकांना कडून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून पाळण्याची प्रथा सुरू केली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला "माझ्या मायबोलीची गोड मधाळ वाणी, मराठी भाषा आहे महाराष्ट्राची राणी, दऱ्याखोऱ्यात घूमते मराठी कहाणी. माझ्या मराठी भाषेचा मला खरंच खूप अभिमान आहे माझ्या मायबोलीच्या संवर्धनासाठी मी निश्चितच तन-मन-धनाने प्रयत्नशील आहे. मी एक शिक्षक असून माझा समाजातील पालक व विद्यार्थी यांच्याशी नित्य संपर्क असतो पालक आणि विद्यार्थी ही नकळत शिक्षकांचे अनुकरण करतात. या दृष्टीने मी समाजात मराठी भाषा संवर्धित आणि विकसित करण्यासाठी प्रयत्न करते यामध्ये पालकांसाठी जनजागृती आणि विद्यार्थ्यांसाठी संस्कारात्मक उपाययोजनांचा उत्तम पर्याय आहे.
मला माझ्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे परंतु ही गोष्ट एकटी पुरती मर्यादित असून चालणार नाही मराठी भाषेचे महत्त्व समाजातील प्रत्येक नागरिकास कळायला हवे त्यासाठी पुढील उपाययोजना करण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवेत
विद्यार्थ्यांसाठी भाषिक उपक्रम
1] एका वाक्यावरून अनेक प्रश्न-- उदाहरणार्थ - वाऱ्याने विहिरीत पडलेल्या मांजराला वर काढले. प्रश्न- मांजर विहिरीत कशाने पडले ? मांजर वाऱ्याने कशात पडले ? विहिरीत वाऱ्याने कोण पडले ?अशाप्रकारे 2] विद्यार्थ्यांची हजेरी मराठीतून घेणे आणि विद्यार्थ्यांनीही प्रतिसाद मराठीतून देणे. 3] शब्द डोंगर- सुरूवातीला एक शब्द देऊन त्यामध्ये परत एका एका शब्दाची भर घालून वाक्य तयार करणे आणि शब्दसंग्रह वाढविणे .उदाहरणार्थ शाळा, माझी शाळा, सुंदर माझी शाळा , अशाप्रकारे 4] शब्दकोडी तयार करणे व ती सोडवणे . शब्दकोडी सोडवण्याची स्पर्धा लावून त्यामध्ये बक्षीस देणे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मराठी शब्द संपत्तीत नक्कीच भर पडेल . 5] विशिष्ट शब्दापासून तयार होणारे शब्द, वाक्य तयार करणे. उदा. क पासूनच्या शब्दापासून वाक्य तयार करणे .▪️काकीने काकाच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने कराकरा कापुन कोपऱ्यात कोंबले. 6] शब्द एक रुपये अनेक -- उदा. पाऊस, पावसामुळे, पावसात, पावसाने ,पावसाच्या. 7] भाषिक कोडी-- यमक जुळवून शब्दकोडी तयार करून, ओळखा पाहू मी कोण? अशा प्रकारची कोडी विद्यार्थ्यांना विचारणे आणि त्यांना ती स्वतः तयार करायला लावणे. 8] शब्द साखळी विद्यार्थ्यांना शेवटच्या अक्षरापासून शब्द तयार करायला लावणे उदाहरणार्थ - आरसा- साखर-रवा- वासरू- रुमाल- लता .... अशाप्रकारे कितीतरी शब्द विद्यार्थी शोधतात आणि मराठी शब्द संपत्तीत भर पडते. 9] शब्दातील अक्षरांवरून वाक्य-उदा. शिकार--- शि- शीला,का- काल,र- रडली. शीला काल रडली. 10] कल्पना करा आणि लेखक व्हा--- उदा. तुम्हाला चार हात असते तर!, छोटा भीम तुमच्या घरी आला तर!, तुम्हाला पंख असते तर! अशा प्रकारे काल्पनिक लिखाण करून कल्पनाशक्ती आणि शब्दसंपत्ती वाढवणे तसेच ज्ञानरचनावादी शिक्षण देणे . 11] यमक जुळवून छोट्या-छोट्या कविता तयार करणे--- उदा. बागेमध्ये चला चला. मजाच मजा करू चला. किंवा एक होता ससा. त्याला सापडला पैसा. अशाप्रकारे . 12] चित्र वर्णन --- विद्यार्थ्यांना वेगवेगळी चित्रे दाखवून त्यांचे वर्णन करण्यास सांगणे त्यामधून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती, शब्दसंग्रह वाढतो आणि मराठी भाषेवर प्रभुत्व निर्माण होण्यास मदत होते. 13] शब्दांवरून गोष्ट बनवणे--- चार पाच शब्द देऊन त्या शब्दां पासून गोष्ट तयार करण्यास सांगणे.उदा. जंगल, साधू, हरीण.14] दैनंदिनी लेखन-- विद्यार्थ्यांना दैनंदिनी लिहिण्याची सवय लावणे. यामध्ये विद्यार्थ्यांनी सकाळपासून केलेल्या गोष्टी लिहिण्यास लावणे त्यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दसंग्रह वाढतो आणि विचार करण्याची शक्ती निर्माण होते मराठी भाषेवर प्रभुत्व निर्माण होण्यास नक्कीच मदत होते . 15] गोष्टीचा शनिवार -- शनिवारी प्रत्येक विद्यार्थ्याने गोष्ट सांगणे,गोष्ट तयार करणे ,आणि गोष्ट सांगण्याची स्पर्धा ठेऊन बक्षिसे देणे यातून विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढेल मराठी भाषेविषयी गोडी निर्माण होईल त्यातील सौंदर्यदृष्टी समजेल. 16] भाषा संवाद--- विद्यार्थ्यांना विशिष्ट विषय देऊन एकमेकांशी संवाद करण्यास सांगणे. यामधून विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी भाषिक कौशल्य विकसित होऊन शब्दसंग्रह वाढण्यात मदत होते. मराठी भाषेची गोडी निर्माण होते . 17] मुलाखत-- विद्यार्थ्यांना आपल्या गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा व्यावसायिक व्यक्ती यांची मुलाखत घेण्यास सांगणे. विद्यार्थी स्वतः विचार करून मुलाखतीसाठीचे प्रश्न तयार करतात यामधून मराठी भाषेवर प्रभुत्व निर्माण होते .
अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी निर्माण करणे आणि मराठी भाषेवर प्रभुत्व निर्माण करण्यास मदत करणे. शेवटी एवढेच म्हणेल .भाषा मरता देशही मरतो. संस्कृतीचाही दिवा विझतो. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीनदीन.स्वर्ग लोकाहुनी थोर मला तिचा अभिमान .
लेखिका- श्रीम.पवार ताई .
जि.प.प्रा.शा.शेंडगेवाडी
ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर