शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

13 February 2023

मोबाईलला आवरा, मुलांना सावरा : श्री रविकिरण साळवे

मोबाईलला आवरा, मुलांना सावरा *'बचपन साथ रखियेगा दोस्तो,* *जिंदगी की शाम में* *उम्र महसूस ही नहीं होगी, सफर के मुकाम में।* गेली दोन वर्ष कोरोना सारख्या महाभयंकरआजाराने जगात थैमान घातले असतांना कोरोना साथीचा सगळ्यात जास्त परिणाम झाला असेल तर तो शिक्षण क्षेत्रावर कोरोना काळात सरकारी आदेशाने ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली खरी पण त्याचा सर्वात जास्त तोटा झाला असेल तर तो बालकांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा... ऑनलाइन शिक्षणाकरीता पालकांनी मुलांना अँड रॉईड मोबाईल हातात दिला आणि इथेच खरा शिक्षण आणि विद्यार्थी यांचा घात झाला.ऑनलाइन शिक्षण व कलासेसच्या माध्यमातून अनेक खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी लाकडाऊनच्या काळात आपले गल्ले भरून घेतले आणि आपण वेडे पालक मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून धडपड करीत राहिलो. यात आपण दोन्ही बाजूंनी लुटलो गेलो एक म्हणजे क्लासवाल्यांकडून ऑनलाईन क्लासच्या नावाखाली दूसरे म्हणजे मुलाच्या आरोग्यावर खर्च करून. आजच्या पिढीला मोबाईलची ओळख आईच्या गर्भात असल्यापासून झाली आहे पूर्वी आपले पूर्वज म्हणायचे- "तो सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आला आहे." आजची मुले हातात मोबाईल घेवून जन्माला आली आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.कारण बाळ पोटात असताना *'बेबी बम्पचे'* फोटो सोशल मिडीयावर अपलोड करून बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करणारे अनेक आईवडील व सेलिब्रिटी आपण पाहतो.हे फोटो सेशनचे फॅड आपल्याकडे कुठून आले याचा अद्यापही शोध लागला नाही. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला घास भरवतांना मोबाईलवर गाणे लावून त्याच्या हातात मोबाईल देणारी आई पहिली की व मग अशाआईची किव आल्याशिवाय राहत नाही" *एवढ्या महागड्या* *मोबाईलने सारंच चित्र पालटलंय* *स्क्रीन टाईम वाढल्याने बालपणच हरवलंय!* आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सहा महिन्यांपासून ते चौदा-पंधरा वर्षांपर्यंतच्या लहान मुलांमध्ये मोबाईल, टिव्ही,लॅपटॉप, कॉम्प्युटर व इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेटेस विषयी मोठी व्यसनाधिनता निर्माण झाली आहे. 'मोबाइल ही गरज राहिलेली नसून त्याचं रुपांतर व्यसनात झालं आहे', या एका वाक्यात आजकालच्या तरूणांच्या मोबाईल व्यसनाचं वर्णन करता येईल. स्मार्टफोनमुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक वेगळंच परिवर्तन घडून आलं असलं तरीही या परिवर्तनामुळे आपल्याला कळत-नकळत अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे. लहान मुलांचे वाढत चाललेलं स्क्रीन टायमिंग हा सध्या पालक म्हणून आपल्या चिंतेचा विषय आहे. सतत मोबाईल वापरल्याने मुलांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. याचा मुलांच्या बुद्धीमत्तेवर व कल्पनाशक्तीवर सुद्धा गंभीर परिणाम होत असे तज्ञ सांगतात. अमेरिकन अकादमी ऑफ पेडियाट्रिकसने दोन वर्षापूर्वी केलेल्या संशोधनातून लहान मुलांना स्क्रीनटाईम न देण्याची सुचना केलेली आहे. या संस्थेच्या अहवाला नुसार मुलांसाठी ४० मिनिटांपेक्षा जास्त स्क्रीन टाईम नसावा. अशी शिफारस केली आहे. जसे आपल्याला दैनंदिन जीवनात 'टी ब्रेक', 'लंच ब्रेक' हवे असतात तसे, *स्कीन टाईम ब्रेक* ही मुलांच्या व आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे "ऑर्बीस इंडिया" या संस्थेच्या निरीक्षणानुसार भारतात मोबाईल वापरामुळे अंधत्वाचे प्रमाण प्रति एक हजार मुलांमागे ०.८ आहे. यापैकी फक्त ५९ टक्क्यांपेक्षा कमी बालकांवर प्रतिबंधात्मक उपचार केले जातात याचा अर्थ असा होतो की उरलेल्या मुलांवर उपचार न झाल्याने त्यांना डोळ्याचे अनेक विकार तसेच कायमचे अंधत्व येवू शकते? "कोविड" साथीच्या आजारात मुलांचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. *"शाळा बंद, शिक्षण चालू"* हे ब्रीदवाक्य घेवून शासनाने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचा फंडा वापरला परंतू ऑनलाईन शिक्षण होत असतांना अभ्यासाव्यतरिक्त मुले ऑनलाईन राहू लागली आणि वाढलेला स्क्रीन टाईम बालकांकरीता समस्या निर्माण करून गेला. नेत्रतज्ज्ञाच्या मते सततच्या मोबाईल वापरामुळे मुलांच्या डोळयांवर गंभीर परिणाम झाले आहेत. जास्त स्क्रीन टाईममुळे डोळे कोरडे होणे, अश्रू ग्रंथी अवरोधित होणे, डोळ्यात पांढरे रिप्लेक्शन दिसणे, डोळयाचा काळा भाग पांढरा होणे , डोळे मिचकावणे, सतत डोळे चोळणे, डोळ्याला पाणी येणे, मोबाईलच्या कृत्रिम प्रकाशामुळे डोळयांचं आरोग्य बिघडून उच्च चष्मा लागणे तसेच डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर ताण येऊन त्या निकामी होणे परिणामी कधीही बरा न होणारा *'काचबिंदू'* सारखा आजार होणे इ. समस्या निर्माण होतात.वेळीच या समस्यांकडे लक्ष दिले नाही तर अतिशय लहान वयात सततच्या इलेक्ट्रॉनिक स्क्रीन वापरामुळे मुलांमध्ये कायमची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे नेत्रतज्ज्ञ सांगतात. स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मुलांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुलांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत आहेत. स्वीडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठाने स्मार्टफोन वापरणा-या विशीतील तरुणांचा अभ्यास केल्यावर त्यातून पुढे आलेले निष्कर्ष खूपच धक्कादायक होते. या निष्कर्षानुसार मोबाईलच्या अतिवापराने मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसले आणि विशेष म्हणजे हे प्रमाण मुले आणि मुली दोघांमध्येही आढळून आले आहे.अशा मुलांना झोप कमी येते म्हणजेच त्यांना निद्रानाश या आजाराने ग्रासले आहे. ज्याचा सरळ परिणाम अभ्यासावर व दैनंदिन कामावर होतो. सतत फोनवर असलेल्या मुलांची विचार' शक्ती खुंटते ही मुले एकलकोंडी बनतात, स्वभाव चिडचिडा होतो. अशी मुले समाजापासून दूर जातात. त्यांना मित्रही फारसे नसतात तसेच अशा मुलांना स्वत:च्या जगात रमायला आवडते जे त्यांच्या दृष्टीने योग्य नाही. त्यासाठी मुलांनी रात्री किमान ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे.. हल्ली मुले सतत स्मार्टफोनशी खेळत असतात त्यांना फोन मधील सर्व येतं म्हणून पालकांना आपल्या मुलांचं कौतुकही वाटतं. आपण समाजात मोठ्या फुशारकीने सांगतो-"मला फोनमधील काही समजत नाही परंतू माझ्या मुलाला किंवा मुलीला सर्व समजतं" पण पालक म्हणून आपण मुलांच्या हातात स्मार्ट फोन देतांना विचार केला पाहिजे की,मोबाईलच्या अतिवापरामुळे मूलांची सर्जनशक्ती व कल्पनाशक्ती कमी होत आहे. सतत स्मार्टफोन वापरणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये *कार्पल टनलची* समस्या दिसून आली आहे. *कार्पल टनल* या आजारात हाताला मुंग्या येतात, डोक सुन्न पडणे,हातात वेदना आदी लक्षणे मुलांमध्ये दिसून आली आहेत. अशी लक्षणे मुलांमध्ये दिसून येताच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. आपल्या डोक्याचे वजन पेलण्याचे काम आपला पाठीचा मणका करत असतो. मोबाईलमध्ये डोकावण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपण जेंव्हा पुढे वाकतो किंवा झुकतो त्यावेळी पाठीच्या कण्यावर ताण येतो ज्यामुळे मानेच्या मागच्या आणि पुढच्या बाजुला वेदना होतात वैदयकीय भाषेत याला *"टेक्स्ट नेक"* असे म्हणतात ज्यामुळे पाठीच्या मणक्यात गॅप पडण्यासारख्या मणक्याच्या अनेक समस्या, मानेचे आजार मुलांमध्ये दिसून आले आहेत. मैदानावर जाऊन खेळ खेळण्याऐवजी मुले आता मोबाईलवर गेम खेळू लागली आहेत ज्याने मुलांच्या सरीशतर अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुले मोबाईलवर खेळताना तासनतास एका जागी बसून असतात. त्यामुळे त्यांच्यात व्यायामाचा आभाव दिसतो परिणामी एका जागेवर बसून राहिल्याने मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली आहे. ज्यामुळे मुलांना अनेक आजार होत आहेत नुकतेच दिल्लीमध्ये 'कोविड' साथीनंतर झालेल्या सर्वेक्षणात अनेक लहान मुलांना बी.पी., डायबेटीस, किडनीचे विकार डोळ्याचे आजार असे गंभीर आजार झाल्याचे दिसून आलेआहे.ज्या वयात मित्रांच्या टोळ्या घेवून जगायचं त्या वयात औषधाच्या गोळ्या खावून जगण्याची वेळ आपल्या मुलांवर यावी यासारखे दुर्दैव नाही. पालक म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही! "कोविड " साथीनंतर शाळा सुरु झाल्या मुले नियमित शाळेत येवू लागली परंतू माझ्या शाळेत अनेक विद्यार्थ्यांना फळ्यावर लिहिलेले न दिसण्याची समस्या मला जाणवू लागली आणि धक्कादायक बाब म्हणजे ७० विद्यार्थी संख्येपैकी जवळ-जवळ आतापर्यंत ७ विद्यार्थ्यांना चष्मे लागले आहेत आणि आणखी ३-४ जणांना चष्मा लागण्याची शक्यता आहे. शाळेतील बहीण- भाऊ असणारे विद्यार्थी सतत शाळा बुडवत होते. पालक भेट घेतली असता त्यांच्या आजोबांनी अतिशय धक्कादायक माहिती सांगितली की, दोघेही पहाटे ४-५ ला उठून मोबाईल पाहतात त्यामुळे अभ्यास पूर्ण होत नाही आणि त्यामुळे ते शाळेत येत नाहीत. आजही अनेक पालकांचे फोन येतात "सर माझा मुलगा/ मुलगी सतत मोबाईलवर गेम खेळतो त्याला समजून सांगा." पालक म्हणून आपण काही बंधने स्वत:ला घातली पाहिजेत. भोजन करताना मोबाईल पाहू नये. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या स्मार्टफोन पाहू नये. संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत किमान दोन तास घरातील मोठ्या व्यक्तींनी मोबाइल, टीव्ही, बंद ठेवावेत जेणे करून विद्यार्थ्यांना दोन तास बिना अडथळा अभ्यास करता येईल उस्मानाबाद जिल्हयातील जकेकरवाडी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एक ऐतिहासिक ठराव केला की, मुलांच्या अभ्यासासाठी संध्याकाळी ७ ते ९ या कालावधित गावातील सर्व टि.व्ही. व मोबाईल बंद ठेवले जातील ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावात वाडीवस्तीवर सुरु करणे ही काळाची गरज आहे. "कोरोना' काळात ऑनलाईन शिक्षणासाठी आपण मोबाईल दिला खरा पण मुले अभ्यासच करतात की इतर काही गोष्टी पाहतात याकडे पालक म्हणून आपण लक्ष दिले नाही. २०१९ साली मोबाईलवर पॉर्न फिल्म' पाहणाऱ्यांची जागतिक संख्या होती ११५ दशलक्ष त्यात भारतीयांचे प्रमाण होते ८६% आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यात ... मुलींचे प्रमाण आहे. ४०% आणि या सर्व मुली आहेत १६ ते २२ वयोगटातील. ज्या वयात सावित्रीबाई फुले, माँ जीजाऊ यांचे विचार आणि संस्कार मुलींमध्ये रुजवायचे त्या वयात आपण त्यांच्या हातात मोबाईल देवून काय मिळवले याचे सर्व पालकांनी चिंतन करणे गरजेचे आहे. मुलांमध्ये लैंगिक साक्षरता निर्माण करणे. त्यांना लैंगिक शिक्षण देणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. त्याकरीता प्रत्येक आईवडील हे उत्तम समुपदेशकाची भूमिका पार पाडू शकतात. वडीलांनी मुलाचा मित्र व आईने मुलीची मैत्रिण बनून अतिशय समजदारीने मुलांशी या विषयावर बोलले पाहिजे.तेंव्हाच किशोर वयात भरकटलेली ही पिढी आपण योग्य मार्गांवर आणू शकतो. त्यासाठी कुठल्याच बाहेरील व्यावसायिक समुपदेशकाची गरज नाही, आपल्या मुलांचं भविष्य आणि आयुष्य सुरक्षित करणासाठी पालकांनी सतर्क होणे गरजेचे आहे आजकाल सोशल मिडीयावर अनेक अश्लील व कामोतेज्जक वेबसिरीजनी धुमाकूळ घातला आहे पालकांनी आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या मुलामुलींचे मोबाइल तपासून पहावेत जेणेकरून तो काय पाहतो? काय सर्च करतो? याचा आपल्याला अंदाज येईल.त्यामुळे सर्व पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृती जगात महान आहे. ही संस्कृती जर टिकवायची असेल तर आपल्या मुलांमुलींवर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर केले पाहिजे संस्कृती जर टिकली नाही तर श्रद्धा वालकरच्या शरीराचे जसे ३५ तुकडे झाले तसे आपल्या मुलींचे ५३ झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून सर्व पालकांना या माध्यमातून विनंती करतो. *"मोबाईलला आवरा, मुलांना सावरा."* श्री.रविकिरण गणपतराव साळवे. मुख्याध्यापक, जि. प. प्राथ.शाळा केंदळ बु.ता.राहुरी जि.अ.नगर मोबा- 9420807347 🙏🙏🙏🙏🙏🙏