शिक्षण विभाग प्राथमिक जि.प.अहिल्यानगर च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य इतर संकेतस्थळावर /प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे हा कॉपीराइटचा भंग मानून कारवाई प्रस्तावित केली जाईल.

जि.प.शाळा सौंदाळा

 जिल्हा परिषद शाळेचा पट दुपटीपेक्षाही जास्त वाढतो अशा सौंदाळा शाळेची यशोगाथा.

    तसे बघितले तर सर्वच शिक्षक आपल्या दैनंदिन अध्यापनात नवनवीन प्रयोग करीत असतात.असेच एकापेक्षा एक सरस उपक्रम आणि प्रयोग आम्ही शाळेत राबवत गेलो आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षापूर्वी ८१ पट आणि ३ शिक्षक कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा शाळेत आज १८६ पट आणि एका मुख्याध्यापकासह सात शिक्षक कार्यरत आहेत.आणि विशेष म्हणजे शाळेच्या सर्वेक्षणाच्या बाहेरील व परगावातील असे ४० विद्यार्थी या शाळेत दाखल झालेले आहेत.या शाळेच्या या थक्क करणाऱ्या प्रवासावर टाकलेला हा दृष्टीक्षेप......

    पाच ते सहा वर्षापूर्वी शाळेत निरस वातावरण,उजाड शालेय परिसर,जेमतेम शैक्षणिक दर्जा,तसेच गावाचेही शाळेकडे फारसे लक्ष नव्हते.गावाला शाळेविषयी कुठल्याही प्रकारची आस्था दिसत नव्हती.शाळेत जेमतेम ३ वर्गखोल्या होत्या,भौतिक सुविधा सुद्धा अतिशय तोकड्या होत्या .सन २०१३ मध्ये शाळेचा पट जेमतेम ८१ होता ,अश्यावेळी कोणत्या घटकावर अधिक काम करावे असा प्रश्न शालेय प्रशासनाला पडला होता.अश्यावेळी शिक्षकांनी प्रथम भौतिक वातावरण संपन्न करण्यावर विशेष लक्ष दिले.शाळेत वृक्षारोपण केले,तात्कालीन शिक्षकांनी डोक्यावर पाणी वाहून आणून त्या लावलेल्या वृक्षांचे संवर्धन केले.सावलीसाठीची खास झाडे लावली.औषधी वनस्पतीची बाग तयार केली.शाळेला बाहेरून रंग रंगोटी केली.आकर्षक चित्रे काढली,शाळेला असलेल्या संरक्षक भिंतीला नवे रूप दिले.याचाच परिणाम म्हणून शाळेला पंचायत समिती नेवासा मार्फत स्वछ शाळा,सुंदर शाळा हा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर शाळेत शिल्लक असलेली खोली आम्हाला खुणावत होती.या खोलीचा वापर करून त्यात आम्ही अहमदनगर जिल्ह्यात पहिली अशी अग्निपंख प्रयोगशाळा तयार केली.आणि या नवनिर्मितीचा जिल्ह्यातील पहिला मान आमच्या शाळेला तत्कालीन शिक्षक श्री अशोक पंडित यांच्या योगदानामुळे मिळाला.जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.शैलेश नवालयांनी सुद्धा आपल्या या शाळा भेटीत या प्रयोगशाळेचे आपल्या शेऱ्यात जाणीवपूर्वक कौतुक केले आहे.  प्राथमिक शाळेतील सोपे सोपे प्रयोग त्याचप्रमाणे, मनोरंजक गणिती खेळ ठेवण्यात आले.अरविंद गुप्ता यांच्या पुस्तकाचा या कामासाठी प्रभावी वापर झाला.त्यानंतर शालेय आवारत खेळणी बसविण्यात आली.मुलांना घरापेक्षा शाळा आवडू लागली.तेथेच त्यांचे मन रमू लागले.परींनामी अनुपस्थितीचे प्रमाण घटले.मुले आनंदात शाळेत येवू लागली.

    शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जाऊ लागले..आणि या वाढदिवसानिमित्त प्रत्येक विद्यार्थी शाळेला एक कुंडी आणि रोप भेट म्हणून देतो.यातून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट्य साध्य होत गेले. विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची ओळख व्हावी या हेतूने शाळेत  औषधी वनस्पतीची एक बाग तयार केली.त्यानंतर शिक्षक श्री.रविंद्र पागीरे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील पहिली विद्यार्थ्यांची “महात्मा फुले विद्यार्थी बँक” ही संगणकीकृतसॉप्टवेअरअसलेली बँक कार्यान्वितकेली यातून बचत आणि व्यवहारज्ञान वाढण्यास मदत झाली मुले स्वतः बचत करू लागले.मुलांना स्वतः कविता करण्यास तत्कालीन शिक्षिका सौ.तिजोरे मॅडम यांनी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या प्रयत्नातून मुलांनी कविता केल्या मग विद्यार्थ्यांच्या “सोनचाफा” या स्वयंरचित काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले. त्यामुळे मुलामधील कल्पनाशक्तीला अधिक वाव मिळाला.व याचीच फलश्रुती म्हणून जि प अहमदनगर ने तयार केलेल्या काव्यसंग्रहात शाळेतील कृष्णकांत आरगडे या विद्यार्थ्याच्या कवितेची निवड झाली. आत्माविष्काराची अधिक संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने “अविष्कार”या विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन केले.यामध्ये मुलांनी आपापल्या आवडीनुसार कथा,काव्य,विनोद यांचे लेखन केले आहे. शाळेत डिजिटल इंटरअक्टीव बोर्ड आणि स्मार्ट टीवी द्वारे शिक्षण देण्यावर आम्ही भर दिला त्यामुळे अधिक परिणामकारक ज्ञान मिळाले. विद्यार्थ्यांना LCD प्रोजेक्टर द्वारे परिणामकारक आणि अभ्यासपूरक चित्रपट दाखविले त्यामुळे मुलांना ज्ञानाबरोबरच मनोरंजन होऊ लागले.

वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने शाळेत “वाचन कट्टा” तयार करण्यात आला यावर बसून विद्यार्थी अवांतर वाचन करू लागले त्यामुळे वाचन कौशल्य वाढण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती व अनुभव मिळण्यासाठी शाळेत “आठवडे बाजार”भरवूनअनोखाउपक्रम राबविला. आणि या बाजारात हजारोंची उलाढाल झाली विद्यार्थी स्वतः खरेदी विक्री करू लागले.          

          तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर विविध गुणदर्शन स्पर्धेची शाळेत तयारी घेऊ लागलो त्यामुळे अनेक विद्यार्थ्यानी जिल्हा व तालुकास्तरावर अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.तसेच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाच्या पाश्वभूमीवर शाळेत तयारी घेतली जाऊ लागली.याची प्रसिद्धी मिळू लागल्याने परिसरातील लोक या शाळेकडे आकर्षित होऊ लागले.

स्पर्धापरीक्षेचा सौंदाळा PATTERN.......

         इयत्ता दुसरी च्या वर्गापासूनच स्पर्धापरीक्षेची तयारी घेतली जाऊ लागली. त्यामुळे पाचवी पर्यंत अधिक सराव मिळण्यास मदत झाली.त्यानंतर सर्व पालकांच्या मागणीवरून शाळेत पाचवी चा वर्ग जोडण्यात आला.पहिल्याच वर्षी “ईश्वरी अरगडे” या विद्यार्थिनीची इयत्ता सहावी साठी नवोदय विद्यालयात निवड झाली.  याशिवाय जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतही विद्यार्थी निवडले गेले.त्यानंतर सन २०२० मध्ये जिल्हा यादीत ९ विद्यार्थी,२०२१ मध्ये जिल्हा यादीत ४ विद्यार्थी तर २०२२ मध्ये राज्य यादीत ४  व जिल्हा यादीत १२ विद्यार्थी निवडले गेले. त्यामुळे शाळेच्या दर्जाबद्दल आता कोणतीही शंका राहिली नव्हती.नेवासा सारख्या शहरातून सौंदाळा सारख्या खेड्यात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येऊ लागले होते. त्यानंतर शाळेत “सकाळ चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,रंगभरण स्पर्धा” अश्या अभ्यासपूरक  उपक्रम राबविले. शाळेत दहीहंडी व दिवाळी सणाच्या वेळी कार्यानुभव अंतर्गत आकाश कंदील बनविणे, भेट कार्ड बनविणे,गोड फराळ तयार करणे असे नाविन्यपूर्ण व आवडीचे खेळ घेतले. मुलांना परिसराची ओळख,ज्ञान व्हावे म्हणून “शैक्षणिक सहली” चे दरवर्षी आयोजन सुरु केले.त्यामुळे मुलांना आवडीची ठिकाणे बघायला मिळून ज्ञान वाढू लागले. शाळेत “प्लास्टिक बंदी अंतर्गत कापडी पिशव्यांचे वाटप” करण्याचा उपक्रम राबविला.त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली.परिसरातील विविध उद्योगांचे ज्ञान आणि कार्यपद्धती मुलांना माहिती व्हावी यादृष्टीने “औद्योगिक क्षेत्र भेट” हा उपक्रम घेतला यामध्ये साखर कारखाना आणि इतर उद्योगांना भेटी दिल्या त्यामुळे परिसरातील उद्योगधंद्याची ओळख झाली.त्यानंतर शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांची स्वतःची मुले याच जि प च्या शाळेत शिकू लागली त्यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला. शाळेमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने कचरा व्यवस्थापन आणि आरोग्याच्या दृष्टीने योगासनाचे आयोजन केले.शाळेतील शिक्षक श्री.नेहूल सर आणि श्री.पठारे सर यांच्याकडून मुलांना योगासनाचे धडे दिले जातात.जेणेकरून बौद्धिक सुदृढतेसोबत शारीरक आरोग्याकडेही लक्ष दिले गेले.त्यानंतर शिक्षकांनी मुलांच्या विकासासाठी सोशल मेडीयाचा वापर केला. शाळेतील प्रत्येक वर्गातील  मुलांचा दररोजचा गृहपाठ सोशल मेडीयाद्वारे पालकांपर्यंत पाठवला त्यामुळे पालक सुद्धा गृहपाठ करून घेऊ लागले त्यामुळे शैक्षणिक प्रगतीत पालकांचा सहभाग मिळाला. शाळेतील शेवटच्या वर्गातील मुलांसाठी दरवर्षी शाळेत “निरोप समारंभ तथा शुभचिंतन” कार्यक्रमाचे आयोजन केले.यात मुले आपल्या शाळेबद्द्लच्या भावना, आठवणी सांगताना आनंदी वाटू लागले.आणि मग इथून पुढे आपोआपच शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढत गेली.

 

नवोदय परीक्षेत शाळेचा डंका.......

          याशिवाय सहावी नवोदय स्पर्धा परीक्षेत शाळेने डंका वाजवला आहे.सन २०२० मध्ये श्री.नेहूल सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वर्षी या शाळेतून २ विद्यार्थी जवाहर नवोदय टाकळी ढोकेश्वर येथे निवडले गेले.त्याननंतर सन २०२२ मध्ये नवोदय परीक्षेत अभूतपूर्व असा निकाल या शाळेने दिला.वर्गशिक्षक श्री रविंद्र पागीरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वर्षात एकाच वर्गात तब्बल ७ विद्यार्थी नवोदय साठी निवडले गेले.हा संपूर्ण महाराष्ट्रात इतिहास झाला आहे.

निधी कसा उपलब्ध केला?

एव्हाना आता गावातील नागरिकांनाही आपल्या शाळेत होत असलेले बदल ज्ञात होऊ लागले होते.त्यानंतर आम्ही शिक्षक आता शाळेसाठी लोकसहभाग जमा करण्याकडे लक्ष देऊ लागलो.लोकही शाळेला स्वेच्छेने मदत देऊ लागले.परिसरातील सेवाभावी संस्थांची या कामासाठी आम्ही मदत घेऊ लागलो.सर्वांनी शाळेच्या उन्नती साठी भरभरून आर्थिक योगदान दिले.ज्या पालकांची आर्थिक तयारी नसेल त्यांनी शाळेत येऊन श्रमदान केले.मुलांच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळेत ‘वार्षिक स्नेहसंमेलने’घेतली यातून लाखो रुपयाचा लोकसहभाग जमा झाला.वर्गवार पालक मेळावे घेतले यातून रोख स्वरुपात मदत जमा झाली.स्थानिक नागरिक,पालक,परिसरातील बँका,स्वयंसेवी संस्था यांची मदत मिळाली.आता दरवर्षी शाळेला पन्नास हजारापेक्षा ही जास्त लोकसहभाग जमा होऊ लागला होता.

सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये शाळेला रोख स्वरूपात ५१,१३२ रुपये तर वस्तुरूपात ११,००० रु किमतीचा स्मार्ट टीवी,५००० रु किमतीचा मुरूम,९७०० रु किमतीच्याधान्य कोठ्या व किचन शेड मधील साहित्य,व रुपये ६०,००० रु किमतीचे जल शुद्धीकरण यंत्र (RO) मिळाले.असे वस्तुरूपात व रोख स्वरुपात मिळून एकाच आर्थिक वर्षात एकूण १,३६,८३२ रुपयांचा लोकसहभाग शाळेसाठी मिळाला आहे.

प्रसिद्धी कशी दिली?

मुलांची शैक्षणिक प्रगती बघून पालक वर्ग सुद्धा सुखाऊ लागला होता आणि शाळेतील शिक्षक आणि शाळा यावर मोकळ्या मनाने विश्वास टाकू लागला होता.आता शाळेचा जर पट वाढवायचा असेल तर शाळेत  होत असलेल्या या परिवर्तनाला प्रसिद्धी मिळणे सुद्धा महत्वाचे आहे हे मर्म आम्ही जाणले आणि मग राबविल्या जाणार्या उपक्रमांना वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळू लागली.स्थानिक पत्रकार जाणीव पूर्वक शाळेविषयी लिहू लागले.तसेच प्रसिद्धीसाठी शाळेचा स्वतंत्र ब्लॉग तयार केला त्या ब्लॉग वर शाळेच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळू लागली.

लोकसहभागातून मिळविलेल्या भौतिक सुविधा ?

    आज अखेर शाळेत डिजिटल इंटरअक्टीव बोर्ड,स्मार्टटीव्ही, मल्टीमेडिया सिस्टीम,सर्व वर्गात संगणक,एल सी डी प्रोजेक्टर,बागेतील वाचन कट्टा,गांडूळ खत प्रकल्प,रेन वाटर हार्वेस्टिंग,लाईट इनवरटर,वाटर फिल्टर, या प्रमुख सुविधा उपलब्ध आहेत.

मान्यवरांच्या भेटी व प्रतिक्रिया-

    आज पर्यंत शाळेत DIECPD संगमनेर मधील एक अभ्यास गट,अहमदनगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.शैलेश नवाल साहेब,तसेच जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस साहेब,उप शिक्षण अधिकारी श्री.आकाश गायकवाड साहेब ,नेवासा पंचायत समितीचे सर्व गट शिक्षण अधिकारी,विस्तार अधिकारी यांच्यासह अनेक अभ्यासू व्यक्तीमत्वानी शाळेला भेटी देऊन शाळेच्या उत्क्रांतीबाद्द्ल समाधान व्यक्त केले आहे.

भविष्यातील नियोजन व उद्दिष्ठ -

    या पुढील काळात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दुपारी मध्यान्ह भोजन आहाराचा लाभ घेताना शाळेत उत्कृष्ठ बैठक व्यवस्था म्हणजे डायनिंग टेबल करण्याचे नियोजित आहे.ज्यावर जेवण आणि इतर वेळेत स्वयं अध्ययन करताना अथवा सामुहिक कार्यक्रमासाठी करता येईल.अश्या बहुउद्देशीय बैठक योजना निर्मिती करण्याचा मानस आहे.तसेच शाळेतील किमान २ वर्गांसाठी tab उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे.त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के निकाल लावण्याचे उद्दिष्ठ आहे. 

शाळेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेत कार्यरत असलेला निर्व्यसनी आणि उपक्रमशील शिक्षक वर्ग आहे,त्यामुळे तंबाखूमुक्त शाळेचा उपक्रम प्रभावी पणे कार्यरत आहे.शाळेच्या या सर्व अविस्मरणीय प्रवासामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री.पंढरीनाथ घुले सर यांच्या मार्गदर्शनात आदर्श शिक्षक श्री.कल्याण नेहूल सर,आदर्श शिक्षक श्री.रविंद्र पागीरे सर,श्री.राजेश पठारे सर,श्रीम.कल्पना साठे मॅडम,श्रीम.कल्पना निघुट मॅडम श्री किशोर विलायते हे मोलाचे काम करत आहेत.तसेच केंद्र गट शिक्षण अधिकारी श्री.शिवाजी कराड साहेब यांचे दिशादर्शक म्हणून मोलाचे योगदान आहे.तसेच,गावच्या सरपंच सौ.प्रियांका शरद आरगडे,गावातील सर्व ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य या सर्वांचा सहभाग तोलामोलाचा आहे आणि या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच हे साध्य झाले आहे,यात तिळमात्र शंका नाही.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा चे शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत यश प्राप्त केलेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक वृंद